दापोली : दापोली तालुक्यातील भिवबंदर येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, दापोलीचा निसर्ग, शेती, बागायती आणि मच्छीमारी उद्ध्वस्त करणारा हा विनाशकारी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी नरेंद्र करमरकर, ज्योती विचारे, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, नगरसेवक संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
पर्यटन, विस्तीर्ण समुद्रकिनारे, मासेमारी, आंबा-काजूच्या बागा आणि निसर्गसंपन्न परिसर अशी दापोलीची ओळख असताना, स्थानिक जनतेला विश्वासात न घेता अणुऊर्जा प्रकल्प लादण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप गुजर यांनी केला. आमचा विकासाला विरोध नसून तालुक्याच्या अस्तित्वावरच घाला घालणाऱ्या अशा विकासाला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट करत त्यांनी मच्छीमार, शेतकरी व बागायतदारांच्या उपजीविकेवर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले. त्याऐवजी दापोलीत जहाजबांधणी, ऑटोमोबाईलसारखे प्रदूषणविरहित व पर्यावरणपूरक उद्योग आणून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या परस्परविरोधी भूमिकेवर जोरदार तोफ डागली. एका बाजूला प्रकल्पाची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे समर्थन करत त्याला ‘ग्रीन’ प्रकल्प म्हणायचे, अशी दुटप्पी भूमिका कदम घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री उदय सामंत जर खरोखरच शेतकऱ्यांच्या बाजूने असतील, तर शासनाने स्थानिकांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. याशिवाय प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसरामध्ये सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप करत गुजर यांनी या सर्व संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडण्याची मागणी केली. हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाईल आणि दापोलीचे निसर्गसौंदर्य व जनतेचे हक्क जपण्यासाठी लोकशाही मार्गाने ऐतिहासिक आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.





