दापोली (दीपक कारकर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, मांदिवली विद्यालयाने निर्विवाद वर्चस्व गाजवत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विद्यालयातील बहुतांश खेळाडूंनी आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारांत विद्यालयाच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. यामध्ये दिया दीपक भुवड हिने ३००० मीटर धावणे आणि ४०० मीटर हर्डल्स या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. आलिया सिद्दिक उमरोलकर (हातोडा फेक), अंतरा संदीप आग्रे (लांब उडी), जान्हवी रवींद्र हुमणे (उंच उडी) आणि सोहम महेंद्र भुवड (१५०० मीटर धावणे व ४०० मीटर हर्डल्स) यांनी आपापल्या क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण कामगिरी केली. तर आलोक सतीश खाडे (४०० मीटर हर्डल्स), रिया दीपक भानशे (३००० मीटर धावणे व ४०० मीटर हर्डल्स), श्रेया नीलेश शिगवण (हातोडा फेक), आक्शा संदीप आग्रे (१०० मीटर हर्डल्स), दक्षा संतोष हुमणे (उंच उडी), सलोनी श्रीधर भानशे (१५०० मीटर धावणे) आणि वृषाली रघुनाथ हुमणे (६०० मीटर धावणे व ८० मीटर हर्डल्स) यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला. याशिवाय प्रियसी प्रकाश बाईत (८० मीटर हर्डल्स), उत्कर्ष तुकाराम गोळे (हातोडा फेक) आणि आक्शा संदीप आग्रे (तिहेरी उडी) यांनी तृतीय क्रमांकावर समाधान मानले. सांघिक प्रकारांत ४x४०० मीटर रिले शर्यतीत मुलींच्या संघाने द्वितीय, तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणारे सर्व खेळाडू आता जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुनील गुढेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या देदीप्यमान यशाबद्दल स्कूल कमिटीच्या चेअरमन श्रीमती गीतांजलीताई वेदपाठक, वीरसाई केंद्राचे केंद्रप्रमुख नागरगोजे सर, मुख्याध्यापक मंगेश कोकीळ, पालक तुषार भानशे, मनोहर जोशी यांच्यासह शालेय समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती आणि मांदिवली परिसरातील ग्रामस्थांनी सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




