चिपळूण : पालघर-विरार येथे पार पडलेल्या ५३ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत चिपळूणच्या संघर्ष क्रीडा मंडळाचा होतकरू कबड्डीपटू कु. शैलेश येडगे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाच्या बळावर त्याची महाराष्ट्र राज्याच्या कुमार गट कबड्डी संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत निवड झाली असून, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्य कबड्डी संघाच्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
एका ग्रामीण भागातून येत आपल्या कौशल्याच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे संघर्ष क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शैलेशच्या या निवडीबद्दल संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने त्याचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, माजी कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ मार्गदर्शक खेळाडू आणि वर्तमान खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शैलेशच्या खेळाचे कौतुक करत त्याला पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच आगामी काळात अंतिम संघात स्थान पटकावून राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचा आणि मंडळाचा नावलौकिक वाढवावा असा विश्वास व्यक्त केला.





