चिपळूण: पालवण गावच्या पाणी कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भरत मारुती सावर्डेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून, पदभार स्वीकारताच पहिल्याच सभेत त्यांनी पाणी व्यवस्थापनात पारदर्शकता आणणारा अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्श निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याची दाहकता आणि संभाव्य पाणीटंचाईचे सावट पाहता संपूर्ण गावाला सुरळीत पाणीपुरवठा करणे हे मोठे आव्हान असते; मात्र दांडगा जनसंपर्क, प्रशासनावरील पकड आणि दांडगा अनुभव यांच्या जोरावर श्री. सावर्डेकर हे आव्हान यशस्वीरीत्या पेलतील असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण निवडीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत ग्रामपंचायत कार्यालयात पाणी व्यवस्थापन व तक्रार नोंदवही अद्ययावत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांसाठी ‘सूचना, संकल्पना व तक्रार नोंदवही’ सुरू करण्यात आली असून पाईपलाईन फुटणे, पाणी न मिळणे किंवा अशुद्ध पाणी पुरवठा होणे अशा तक्रारींची त्वरित दखल घेतली जाणार आहे; तसेच पाणीबचतीसाठी नागरिकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनाही यात सामावून घेतले जाईल. याशिवाय पाणी सोडताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, वीजपुरवठा खंडित होणे अथवा पाणी चोरीसारख्या प्रकारांची लेखी नोंद ठेवून कर्मचाऱ्यांना प्रशासकीय व कायदेशीर संरक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक वाडीला पाणी सोडल्याचा वार, वेळ आणि कालावधी याची अचूक लेखी नोंद ठेवली जाणार असल्याने पाणी वाटपात समानता येऊन वाड्यांमधील वाद कायमचे संपुष्टात येतील. अशा प्रकारे पारदर्शक पाणी व्यवस्थापनाचा पॅटर्न राबवणारी पालवण ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली असून हा उपक्रम इतर गावांसासाठी रोल मॉडेल ठरणार आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रमोद हरिचंद्र भुवड, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घाडगे, ग्रा.प. कर्मचारी विश्वंभर सुर्वे, विशाल भुवड, संभाजी पानगले यांच्यासह सदस्य गणेश शंकर विचारे, विजय भाग्या सावर्डेकर, दत्तप्रसाद कारेकर, गणपत भाऊ साठले, समीर सुर्वे आणि राजेश भुवड उपस्थित होते. या आदर्श निर्णयाबद्दल आणि निवडीबद्दल नूतन अध्यक्षांसह संपूर्ण पालवण ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.






