सावर्डे: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक यश संपादन केले. विद्यालयाच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही गटांतील ४×१०० मीटर तसेच ४×४०० मीटर रिले अशा चारही संघांनी सुवर्णपदकाला गवसणी घालत अव्वल स्थान पटकावले. सांघिक प्रकारांसोबतच वैयक्तिक स्पर्धांमध्येही खेळाडूंनी पदकांची लयलूट केली असून या शानदार कामगिरीच्या जोरावर विद्यालयातील गुणवंत खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या आगामी विभागीय मैदानी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.
वैयक्तिक धावण्याच्या प्रकारांत चिन्मयी शिगवण हिने उत्कृष्ट तंत्र आणि चिकाटीचे दर्शन घडवत ४००, ८०० आणि १५०० मीटर अशा तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून मैदानावर आपला दबदबा निर्माण केला. अडथळा शर्यतीत शौर्य खापरे याने ११० मीटर हर्डल्समध्ये प्रथम स्थान मिळवले, तर विपुल साळवी याने ४०० मीटरमध्ये अव्वल आणि ८०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक संपादन केला. लांब पल्ल्याच्या शर्यतीत इच्छा राजभर हिने ३००० मीटरमध्ये द्वितीय आणि १५०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक पटकावून लक्ष वेधून घेतले. याशिवाय भक्ती घडशी हिने १०० मीटर हर्डल्समध्ये तृतीय, पियुष गुरव याने ४०० मीटरमध्ये तृतीय, तर सर्वेश खापरे याने २०० मीटर शर्यतीत तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या पदकतालिकेत भर घातली. सांघिक रिले प्रकारांत इच्छा राजभर, चिन्मयी शिगवण, मुक्ता भुवड, वंशिका सिंगन आणि भक्ती घडशी यांच्या मुलींच्या संघाने दोन्ही रिले शर्यतींमध्ये बाजी मारली. मुलांच्या दोन्ही रिले गटांत विपुल साळवी, सार्थक घडशी, सर्वेश खापरे, शौर्य खापरे आणि पियुष गुरव यांच्या चमूने अफलातून सांघिक समन्वय दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व विजेत्या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मैदानावर चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या सर्व खेळाडूंचे आणि त्यांना घडवणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांतशेठ निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संस्थेचे विश्वस्त तथा शालेय समिती चेअरमन शांताराम खानविलकर, मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शालेय समिती सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून विभागीय स्तरावरील पुढील आव्हानासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.




