खेड : शहरातील नामांकित उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कारवर हल्ला चढवून तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खेड पोलिसांना अखेर यश आले असून या प्रकरणातील पाचपैकी तीन संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर ३१ मे २०२६ च्या मध्यरात्री ही खळबळजनक घटना घडली होती. त्यावेळी पाच जणांच्या टोळक्याने जैन यांच्याशी विनाकारण वाद उकरून काढत त्यांचा मोबाईल व कारची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली होती, तसेच त्यांच्या कारच्या दर्शनी काचेची बेदरकारपणे तोडफोड करून परिसरात दहशत माजवली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली होती.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. येवले यांच्यासह दीपक गोरे, व्ही. एस. सातर्डेकर, किरण सकपाळे, सोहेल ढगे आणि विकास पवार यांच्या तपास पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी करत पाचपैकी तीन आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 04 MR 6572) हस्तगत करून ताब्यात घेतली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या उर्वरित दोन फरार आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, अनेक महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा कौशल्याने छडा लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या खेड पोलीस पथकावर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.





