चिपळूण: वैद्यकीय सेवेचा वारसा लाभलेल्या संगमेश्वरच्या कन्या डॉ. श्रिया आकाश रेडीज (खातू) यांनी दंतचिकित्सा शाखेत उल्लेखनीय यश संपादन करत बाल व प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा विषयात एम.डी.एस. (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी) ही सर्वोच्च पदव्युत्तर पदवी पटकावली आहे. बालवयातील मुलांच्या दातांचे आरोग्य सांभाळणे, संभाव्य आजारांना प्रतिबंध घालणे आणि दंतआरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे अशा अत्यंत संवेदनशील व गुंतागुंतीच्या शाखेत त्यांनी हे विशेष प्रावीण्य मिळवल्याने संगमेश्वरसह चिपळूणच्या वैद्यकीय जगताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर परिसरासह विविध क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वैद्यकीय संस्कार आणि कुटुंबीयांचे भक्कम पाठबळ या बळावर त्यांनी हे ध्येय साध्य केले आहे. संगमेश्वर येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रदीप खातू यांच्या त्या कन्या, चिपळूणचे नामवंत तज्ज्ञ डॉ. प्रसाद खातू यांच्या भगिनी आणि चिपळूणचे प्रसिद्ध उद्योजक वैभव नथुराम रेडीज यांच्या त्या स्नुषा आहेत. या पारिवारिक वारशातून मिळालेल्या प्रेरणेमुळेच त्यांनी अत्यंत चिकाटीने उच्च शिक्षणाचा हा टप्पा गाठला.
डॉ. श्रिया यांच्या या यशाची दखल घेत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. लहान मुलांच्या दंतआरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या या विशेष शाखेतील ज्ञानाचा स्थानिक परिसरातील बालकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत आमदार निकम यांनी रुग्णसेवेची ही परंपरा अशीच पुढे नेण्यासाठी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलींसाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यास रेडीज परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर जानवलकर, संदीपशेठ जागुष्टे, विजय भुवड, वरुण (दादू) गुडेकर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन साडविलकर, विश्वनाथ कांबळे आणि राजा कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विशेष पदव्युत्तर पदवी संपादन करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. श्रिया रेडीज यांच्या सेवाभावी प्रवासासाठी सर्व स्तरांतून सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.





