लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाट व पूल परिसरात सातत्याने घडणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण पट्ट्याची उच्चस्तरीय चौकशी करून महामार्गाचे तातडीने तांत्रिक व सुरक्षा परीक्षण करावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी केली आहे. अंजणारी ते वाकेडदरम्यान गेल्या दोन महिन्यांत तब्बल बारा अपघात घडले असून, काल रात्री कर्तव्य बजावण्यासाठी जात असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड यांच्यासह ट्रकचालक आणि क्लिनर अशा तिघांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहत जखमी कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत जलद सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना कदम यांनी केली.
महामार्गावरील अपघातांसाठी नेहमीप्रमाणे केवळ चालकांना जबाबदार ठरवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आपले दायित्व झटकता येणार नाही, असे सांगत घाटातील धोकादायक उतार, अंध वळणे, अवजड वाहनांची वर्दळ, संरक्षक भिंती आणि दिशादर्शक फलकांचा अभाव या कारणांची कसून तपासणी होण्याची गरज कदम यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, १३ ऑगस्ट रोजीच या भागातील अपघातप्रवण जागांकडे लक्ष वेधून लेखी निवेदनाद्वारे उपाययोजनांची मागणी करण्यात आली होती, परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्या निवेदनावर प्रशासनाने नेमकी काय कृती केली, याचा जाहीर लेखी खुलासा करावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अंजणारी ते वाकेड मार्गावरील अपघातांची विशेष पथकामार्फत चौकशी, तज्ज्ञ अभियंत्यांकडून महामार्गाचे रोड सेफ्टी ऑडिट, रस्त्याच्या तांत्रिक रचनेची पडताळणी, रिफ्लेक्टर्स, प्रकाशव्यवस्था आणि मजबूत क्रॅश बॅरिअर्स बसवणे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची ठाम मागणी त्यांनी लावून धरली. महामार्गाच्या बांधकामातील त्रुटींमुळे निष्पापांचा बळी जात असल्यास संबंधित यंत्रणा, कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी, असा इशारा कदम यांनी दिला आहे. कोकणवासीयांना उद्घाटनाच्या घाईत झालेला रस्ता नव्हे तर सुरक्षित प्रवासाची हमी हवी असून, दुर्घटनेनंतर चौकशीचे सोपस्कार करण्यापेक्षा भविष्यातील जीवितहानी रोखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.





