मदत करणाऱ्या निलेश कळवस यांचा नगरसेवक योगेश कावतकर व पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्यावतीने गौरव
लांजा/अरबाज नेवरेकर : अडचणीत सापडलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला तत्परतेने धावून जात पोलीस शिपाई निलेश कळवस यांनी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत लांजा पोलीस स्थानकात नगरसेवक योगेश कावतकर व पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बुधवार, १५ सप्टेंबर रोजी लांजा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सारस्वत वसाहत येथे माजी सैनिक श्रीनिवास देशपांडे यांच्या जमिनीतून जाणारी पाण्याची पाईपलाईन फुटली होती. पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी देशपांडे हे स्वतः जमीन खोदण्याचे काम करत होते. मात्र वयोमानामुळे त्यांना हे काम करणे अडचणीचे ठरत होते.
दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी या परिसरातून जात असलेल्या पोलीस शिपाई निलेश कळवस यांच्या निदर्शनास ही बाब आली. ज्येष्ठ नागरिकाला होत असलेला त्रास लक्षात येताच त्यांनी कोणताही विलंब न करता स्वतः जमीन खोदण्यास सुरुवात केली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी श्रीनिवास देशपांडे यांना प्रत्यक्ष मदत केली.
निलेश कळवस हे गोडनिंब टॅप महामार्ग पोलीस येथे नियुक्त असून सध्या लांजा येथे बंदोबस्तासाठी आले आहेत. कर्तव्य बजावत असतानाच परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अडचणीची दखल घेत त्यांनी केलेली ही मदत पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरली.
कळवस यांच्या या तत्परतेचे आणि सामाजिक जाणिवेचे कौतुक करण्यात आले. लांजा पोलीस स्थानक येथे नगरसेवक योगेश कावतकर यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे उपस्थित होते. यावेळी निलेश कळवस यांना प्रशस्तीपत्रकही प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकाच्या अडचणीच्या वेळी पुढे येत त्यांनी केलेल्या मदतीचे परिसरातून कौतुक होत असून, पोलीस दलातील कर्तव्याबरोबरच माणुसकी जपणाऱ्या या कृतीने नागरिकांमध्येही सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.





