रत्नागिरी : धार्मिक उत्सवांची जोड देत सामाजिक प्रबोधनाचा जागर करण्यासाठी आणि शासनाचे कल्याणकारी उपक्रम थेट जनतेच्या दारापर्यंत नेण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील प्रसिद्ध ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थ, महिला शेतकरी आणि गणेशभक्तांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती देत थेट लाभाचे आवाहन करण्यात आले.
या मार्गदर्शन सत्रात विविध विभागांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. सहाय्यक कृषी अधिकारी विशाल शिंदे यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, शासकीय अनुदाने आणि आधुनिक शेतीविषयक उपक्रमांची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना प्रगतीची दिशा दाखवली. तर नाटे विभागाच्या सुपरवायझर स्नेहल डांगमोडेकर-जाधव यांनी प्रामुख्याने महिला शेतकरी सन्मान योजना तसेच महिला सक्षमीकरणाच्या योजनांवर सखोल प्रकाश टाकला. ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागांशी थेट संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
या सामाजिक उपक्रमासाठी सागवे जिल्हा परिषद सदस्य सोनाली ठुकरूल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासमवेत ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने स्थानिक महिला शेतकरी व भाविक उपस्थित होते. सण-उत्सवाच्या आनंदात जनकल्याणाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारा हा माहितीपर संवाद अत्यंत कौतुकास्पद ठरला असून, यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.





