मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वातावरण तापले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला असून, आता हा मोर्चा ‘मेट्रो सिनेमा’पासून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत या बदलाची माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभारावरून विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांना एकत्र आणत ठाकरे बंधूंनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला ‘गर्जना’ असे नाव देण्यात आले असून, त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
यापूर्वी या मोर्चाचा मार्ग वेगळा निश्चित करण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी मोर्चाचा मार्ग बदलण्याची विनंती केली होती. पोलिसांच्या या विनंतीला मान देत आता मोर्चा ‘मेट्रो सिनेमा’ ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदललेल्या मार्गाची महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक तसेच मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये, “निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचा ‘गर्जना’ मोर्चा ४ ऑक्टोबर २०२६ रोजी निघणार आहे. मुंबई पोलिसांच्या विनंतीनुसार मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला असून, तो आता मेट्रो सिनेमा ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा असेल,” असे म्हटले आहे. तसेच मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्वांनी बदललेल्या मार्गाची नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना’ मोर्चाचा बदलला मार्ग; मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय
Leave a Comment






