दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधात आज कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील आंदोलन तापलं आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलकांची धरपकडही केली जात आहे.
या दरम्यान, दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याच्याविरोधात मोठी कारवाई केली असून, त्याला गुरुग्राम येथील घरातून ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांची एक टिम सकाळी सुमारे ७ वाजून ४८ मिनिटांच्या सुमारास गुरुग्राममधील सेक्टर-४६ मधील केंद्रीय विहार येथील ध्रुव राठीच्या निवासस्थानी पोहोचली. तिथे ध्रुव राठीच्या आईने दरवाजा उघडताच पोलीस घरातदाखल झाले. तसेच ध्रुव राठीला ताब्यात घेऊन निघून गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचं ५० सदस्यीय पथक रात्रीपासूनच त्यांच्या घराबाहेर उपस्थित होतं. त्यानंतर सकाळी या पोलिसांनी ध्रुव राठी याला आपल्या ताब्यात घेतलं. मात्र ध्रुव राठी याला नेमकं कोणत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं याची माहिती समोर येऊ शकलेली नाही.
ध्रुव राठीने बंगळुरू येथील आंदोलनात घेतला होता सहभाग गुरुवारी बंगळुरू येथे एसआयआरविरोधात झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये ध्रुव राठीने सहभाग घेतला होता. तसेच आज दिल्लीतील जंतर मंतर येथे होत असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करणारी पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच हे आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यातयेत असलेल्या कारवाईवर टीका करत त्याने लोकांना मोठ्या संख्येने जंतर मंतर येथे पोहोचण्याचं आवाहन केलं होतं.





