सावर्डे: इटली येथे रंगणाऱ्या ९ व्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान पटकावणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू कु. आकांक्षा कदम हिचा सावर्डे येथील संपर्क कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फोटो फ्रेम देऊन विशेष गौरव करण्यात आला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ६२ हून अधिक पदकांची लखलखती कमाई करणाऱ्या आणि मालदीवमधील ६ व्या एशियन कॅरम चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालून देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या आकांक्षाने ग्रामीण भागातून घेतलेली ही जागतिक भरारी रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारी ठरली आहे.
सत्कारप्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम यांनी आकांक्षाच्या अफाट जिद्दीचे व मेहनतीचे कौतुक करत, तिच्या या अद्वितीय यशामुळे क्रीडा जगतात पाऊल ठेवणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींना नवी प्रेरणा मिळेल आणि आगामी जागतिक स्पर्धेतही ती भारताची सुवर्णपताका दिमाखात फडकवेल असा दृढ विश्वास व्यक्त केला. या दिमाखदार सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य मंगेश बंडागळे, सागर तांदळे, पंकज पुसाळकर, सचिन साडविलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच आकांक्षावर अभिनंदनाचा वर्षाव करत इटलीतील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.





