मंडणगड: ग्रामपंचायतीची थकीत पाणीपट्टी भरण्यावरून मुरादपूर गावातील सरपंचांना शिवीगाळ करत दमदाटी करणे तसेच विकासकामांच्या ठेकेदारांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुरादपूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच फरिदा अब्दुल रझाक खल्फे (वय ७५ वर्षे) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मुरादपूर ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर, गावातील गैरअर्जदार कैसर अब्दुल्ला हर्ले यांच्याकडे गेल्या ५ वर्षांपासून थकीत असलेली पाणीपट्टी भरण्याबाबत सरपंच फरिदा खल्फे यांनी विचारणा केली. या गोष्टीचा राग मनात धरून कैसर हर्ले आणि वाहिद अलिमिया राजेखान यांनी सरपंचांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी सरपंचांच्या बाजूने बोलणाऱ्या ग्रामस्थांनाही त्यांनी शिवीगाळ व अरेरावी केली.
याशिवाय, ग्रामपंचायतीमार्फत गावात येणारी विविध विकासकामे होऊ न देणे, ग्रामपंचायतीकडून कामे मिळालेल्या टेंडरधारकांना धमकावून “जर तुम्ही कामे केली तर तुम्हाला ठार मारून टाकू” अशा प्रकारची धमकी गैरअर्जदारांनी दिल्याचा आरोप सरपंचांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी कैसर अब्दुल्ला हर्ले आणि वाहिद अलिमिया राजेखान (दोन्ही रा. मुरादपूर, ता. मंडणगड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक भरत गोविंद धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा
Leave a Comment





