चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षितता आणि वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पादचारी पुलाच्या कामाला अखेर मूर्त रूप येत आहे. सावर्डे परिसरातील ग्रामस्थ आणि रेल्वे प्रवाशांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरलेल्या या मागणीची पूर्तता होत असून, या बहुप्रतिक्षित पादचारी पुलाचा भव्य भूमिपूजन सोहळा शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावर्डे यांच्या पुढाकारातून आणि निमंत्रणावरून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
सावर्डे रेल्वे स्थानकावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रूळ ओलांडताना होणारी मोठी कसरत, संभाव्य अपघातांचा धोका आणि वाढती गैरसोय कायमस्वरूपी दूर व्हावी, या हेतूने सातत्याने हा पाठपुरावा सुरू होता. आता प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीला सुरुवात होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून स्थानकावरील पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील सर्व मान्यवर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, व्यापारी बांधव आणि दैनिक रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे आणि उपाध्यक्ष देवराज गरगटे यांनी केले आहे.





