गणपतीपुळे (वैभव पवार) : रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे-विरापुळे नवरात्र उत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक पावित्र्याचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांत संपूर्ण गावात मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करून नवरात्रोत्सव साजरा करण्याची तब्बल २९ वर्षांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा या मंडळाने यंदाही अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात सुरू ठेवली आहे.
उत्सव सुरू होण्यापूर्वीच मंडळाच्या वतीने गावातील सर्व नागरिक आणि प्रामुख्याने तरुणांमध्ये मद्यपान तसेच मांसाहारापासून दूर राहण्याबाबत व्यापक जनजागृती केली जाते. मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील अबालवृद्ध या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. उत्सवाच्या सुरुवातीला मालगुंड येथून भंडारपुळे येथे वाजतगाजत आणि शिस्तबद्ध भव्य मिरवणुकीने दुर्गामातेच्या मूर्तीची आणून प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतरचे नऊ दिवस संपूर्ण गावात आध्यात्मिक आणि पावित्र्याचे वातावरण अनुभवता येते.
केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता, उत्सवादरम्यान समाजप्रबोधनपर कार्यक्रमांवर अधिक भर दिला जातो. नऊ दिवसांच्या कालावधीत गावात कोणत्याही प्रकारचा वादविवाद अथवा तंटा होणार नाही, याची विशेष दक्षता ग्रामस्थ आणि मंडळाचे कार्यकर्ते घेतात. मंडळाच्या सर्व सदस्यांची एकजूट, शिस्त आणि ग्रामस्थांचे भक्कम सहकार्य यांमुळे हा उत्सव तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. गेल्या पावणेतीन दशकांपासून जपलेली ही आदर्श परंपरा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी यंदाही मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ पूर्ण उत्साहाने सज्ज झाले आहेत.






