खेड: दहा दिवसांच्या उत्साही, भक्तिमय आणि मंगलमय उत्सवानंतर खेड शहरात लाडक्या गणरायाला अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी जयघोषात खेड नगरपरिषद हद्दीतील १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह तब्बल १ हजार ५३० घरगुती गणपतींचे शहरातील विविध विसर्जन घाटांवर विधिवत विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत आनंदासोबतच भावनिक ओलावा स्पष्टपणे जाणवत होता.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर खेड नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने जगबुडी नदीवरील चिपळूण नाका विसर्जन घाट, नारंगी नदीवरील घाट, सुसेरी गणेश घाट तसेच महाडनाका येथील मेहबूब महाडिक विसर्जन घाटावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. सकाळपासून घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू झाल्यानंतर दुपारच्या सत्रात सार्वजनिक मंडळांच्या भव्य विसर्जन मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथके, फुलांची नयनरम्य आरास आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर महिला, युवक आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होत बाप्पाला निरोप दिला. यात खेड शिवसेनेचा ‘महाराजा’ तसेच भाजपच्या गणपतीचेही मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात विसर्जन संपन्न झाले.
यंदाच्या विसर्जन सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे ‘विसर्जन कट्टा टीम’च्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी नगरपरिषद कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून घाटांवर उपस्थित राहत घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे सुरक्षित व शिस्तबद्ध विसर्जन घडवून आणले. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि धार्मिक विधी योग्य रीतीने पार पडावा, यासाठी ही टीम दिवसभर कार्यरत होती. सोबतच नगरपालिकेचे सफाई कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान तैनात राहिल्याने विसर्जनानंतर निर्माण होणारा कचरा तातडीने हटवून घाट परिसराची स्वच्छता तत्परतेने राखण्यात आली.
शहरातील विसर्जन मार्ग आणि घाटांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवत शांतता राखण्यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली. सर्व प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था, स्वयंसेवक आणि भाविकांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे खेड शहरातील गणेश विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत, उत्साहात आणि आदर्श शिस्तीत पार पडला.






