चिपळूण : गणपतीच्या आरतीनंतर सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर नांदगाव-भुवडवाडी येथे मारामारी झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात दुखापत, मारामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव गणपत ठोंबरे यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी वाडीतील नागरिक जमले होते. आरती झाल्यानंतर वैभव ठोंबरे हे राकेश लाखण व मारुती ठोंबरे यांच्यासोबत सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाबाबत चर्चा करत होते. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वैभव यांनी समंजसपणे बोलून हा विषय सोडवूया, असे सांगत असताना तेथे उपस्थित असलेल्या आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या झटापटीत एका आरोपीने हातातील पितळी टाळाने वैभव ठोंबरे यांच्या डोक्यावर मारल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच दुसऱ्या आरोपीने पितळी टाळाने त्यांच्या पाठीवर मारल्याने मुका मार लागला. दरम्यान, पतीला सोडविण्यासाठी आलेल्या विधी ठोंबरे यांच्या कपाळाला झटापटीदरम्यान टाळ लागल्याने त्यांनाही दुखापत झाली.
या प्रकरणी वैभव गणपत ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश सुरेश लाखण, सोमा जिरु लाखण, विजय शंकर ठोंबरे, संजय शंकर ठोंबरे, प्रविण गजानन ठोंबरे, किरण मास्ती ठोंबरे, प्रदीप गजानन ठोंबरे, गजानन लक्ष्मण ठोंबरे आणि मारुती लक्ष्मण ठोंबरे या नऊ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९० व १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी वैभव ठोंबरे आणि विधी ठोंबरे यांच्यावर उपचार करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सावर्डे पोलिस करत आहेत.
चिपळूण : गणपती आरतीनंतर जमिनीच्या वादातून राडा; नांदगावात दोघांना मारहाण
Leave a Comment






