चिपळूण : जमिनीवरील अनधिकृत बांधकाम काढण्यावरून चिपळूण दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा राग मनात धरून शेतात बेकायदेशीर प्रवेश करत कुंपण तोडणे, आंब्याची रोपे उखडणे आणि वृद्ध महिलेला शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार तिवरे-फणसवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवरे-फणसवाडी येथील जमीन गट क्रमांक १५७० ही जागा मूळ फिर्यादी मोहन काशीराम कदम (वय ४३, रा. तिवरे-फणसवाडी, सध्या रा. ठाकूरवाडी, डोंबिवली) यांच्या वडिलांच्या मालकीची आहे. या जमिनीवर बांधण्यात आलेले अनधिकृत घर हटवण्यासाठी फिर्यादीच्या वडिलांनी चिपळूण दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या न्यायालयीन दाव्याचा राग मनात ठेवून संशयित आरोपी मधुकर गणपत कदम (वय ६५), मनिषा गणपत कदम (वय ६०) आणि गोविंद गणपत कदम (वय ७०, सर्व रा. तिवरे-फणसवाडी) यांनी फिर्यादीच्या जागेत बांबूचे कुंपण तोडून बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी जमिनीवर नव्याने लागवड केलेल्या आठ कलमी आंब्याच्या रोपांपैकी चार झाडांची रोपे मुळासकट उखडून फेकून देत आर्थिक नुकसान केले.
हा प्रकार सुरू असताना फिर्यादीच्या वृद्ध आई अनुसया कदम यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांना अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ करत धमकावले. या घटनेनंतर मोहन कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२९(३), ३२४(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.





