लांजा (अरबाज नेवरेकर): शहरातील उड्डाणपुलावर काम करणाऱ्या एका मजुराला भरधाव कारने जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकाला जेरबंद करण्यात लांजा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी चालकाला पाचल परिसरातून ताब्यात घेतले. या गुन्ह्याची उकल करत अवघ्या दोन दिवसांत आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी उड्डाणपुलाच्या कामावर कार्यरत असलेले मजूर गोपाल मुरमु (वय ४५, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) यांना ‘केए ०३ एसी ३६००’ या क्रमांकाच्या महिंद्रा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मजूर गंभीर जखमी झाल्यानंतर कारचालक मौला कासम शेख (वय ३८, मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) हा जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न देता वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून लांजा पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतिमान केली. तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयित चालक पाचल परिसरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पाचल येथे छापा टाकून आरोपी मौला कासम शेख याला शिताफीने ताब्यात घेतले.
सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक साक्षी भुजबळराव, पोलीस हवालदार विलास जाधव, पोलीस अंमलदार उमाजी बजागे आणि सुरज नाईकवाडे यांनी पार पाडली. अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाचा तातडीने माग काढून त्याला गजाआड करणाऱ्या या संपूर्ण तपास पथकाचे पोलीस ठाण्यात कौतुक करण्यात आले असून पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.







