मुंबई: नवरात्रोत्सवाचे वेध लागताच मुंबई, गुजरातसह देशभरात गरब्याची जय्यत तयारी सुरू झाली असतानाच, सोशल मीडियावर ‘भाड्याने गरबा पार्टनर’ मिळण्याच्या व्हायरल पोस्टर्सने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम अशा भुलथापा देणाऱ्या विविध पॅकेजेसचा उल्लेख करत पसरवल्या जाणाऱ्या या जाहिरातींवरून मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये संशयाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची अहमदाबाद सायबर क्राईम विभाग आणि पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, या जाहिराती पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
सदर जाहिरातींमध्ये तासांनुसार गरबा खेळणे, मॅचिंग पोषाख, सोप्या स्टेप्स, सेल्फी, खोटी भेट-कथा, रील्स बनवणे, फूड आउटिंग आणि घरी सुरक्षित सोडण्यासारख्या बाबींचे आमिष दाखवून दीड हजार ते साडेसहा हजार रुपयांपर्यंतची शुल्काची आकारणी जाहीर करण्यात आली होती. मूळची चीनमधील भाड्याने पार्टनर घेण्याची संकल्पना उचलून भारतीय सणांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, हा प्रकार केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून यामागे महिलांची फसवणूक, हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग यांसारखे मोठे सायबर रॅकेट कार्यरत असण्याची भीती व्यक्त होत आहे.
या गंभीर बाबीची दखल घेत मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेत लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित संशयास्पद प्रोफाईल्सवर कडक कारवाईची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये आणि पैशांचे व्यवहार करू नयेत, असे जाहीर आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सध्या तिन्ही शहरांचे सायबर पोलीस या जाहिरातींमागील समाजकंटकांचा कसून शोध घेत आहेत.





