अवघ्या काही तासांतच सिंधुदुर्ग पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या; ६ दिवसांची कोठडी
कुडाळ : मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, आयुष्याला नवी दिशा देण्याची वेळ आली आणि अवघ्या दोन-तीन दिवसांत स्वप्नांच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार होती. घरच्यांसाठी खाऊ आणण्याचा विचार मनात घेऊन घराकडे निघालेल्या २३ वर्षीय दामिनी किरण पालव हिच्या आयुष्याचा मात्र वाटेतच भीषण शेवट झाला. एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेल्या संतापाने तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना कुडाळ तालुक्यातील कडावल-वर्दे परिसरात घडली. पुलाजवळ अडवून नदीपात्रात ओढत नेल्यानंतर धारदार शस्त्राने वार करून दामिनीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिचा वर्गमित्र साहिल विश्राम धुरी याच्यावर आहे. या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला असून, अटकेतील साहिलला कुडाळ न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दामिनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करून आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत होती. मुंबईत मिळालेल्या नोकरीमुळे तिच्या आयुष्याला नवी सुरुवात मिळणार होती. घरापासून दूर जाऊन करिअर घडवण्याच्या तयारीत असलेल्या दामिनीला शनिवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी परतताना मृत्यू अशा प्रकारे गाठेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. वर्दे येथील महाविद्यालयातील शिक्षण आटोपून ती एसटीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कडावल बसस्थानकात उतरली. घराकडे जाण्यापूर्वी तिने आईला फोन केला. ‘तुला वडापाव वगैरे काही खायला आणू का?’ अशी मायेने विचारणा करत ती घरच्यांसाठी खाऊ घेऊन निघाली. आईशी झालेला हा संवाद तिच्या आयुष्यातील अखेरच्या क्षणांपूर्वीचा ठरला.
कडावल-वर्दे पुलाजवळ पोहोचताच दामिनीसमोर तिचाच वर्गमित्र साहिल धुरी उभा ठाकला. प्रेम स्वीकारण्याचा आग्रह त्याने धरल्याचे समोर आले आहे. मात्र, दामिनीने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला. तिचे लग्न ठरल्याची माहिती मिळाल्याने संतप्त झालेल्या साहिलने तिला पुलावरून खाली नदीपात्रात ओढून नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्या पायावर, पोटावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. जीव वाचवण्यासाठी दामिनीने आर्त किंकाळ्या फोडत मदतीसाठी धावा केला; मात्र तिचा आवाज ऐकू येऊनही तो नेमका कुठून येत आहे, हे न समजल्याने एका वाटसरूचे लक्ष त्या दिशेने गेले नाही. मदतीची आस धरून संघर्ष करणाऱ्या दामिनीचा रक्ताच्या थारोळ्यात अखेर मृत्यू झाला.
दामिनीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून स्प्लेंडर दुचाकीने पसार झाल्याचे तपासात समोर आले. काही वेळाने दूध घालण्यासाठी डेअरीकडे जाणाऱ्या स्थानिकांना नदीपात्राजवळ ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या घटनेची माहिती पसरताच परिसरात शोककळा पसरली. काही दिवसांत मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणीचा अशा प्रकारे अंत झाल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कुडाळ पोलिसांनी तपासाला वेग दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक तरुण दुचाकीवरून वेगाने जाताना दिसून आला. सोशल मीडियावरील ओळख, महाविद्यालयातील संबंध आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर वेंगुर्ले तालुक्यातील मठ-धुरीवाडा येथील साहिल धुरीच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून रक्ताचे डाग असलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
अटक करण्यात आलेल्या साहिल धुरीला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेले हत्यार शोधून जप्त करणे तसेच या हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी आणि घटनाक्रमाचा सखोल तपास करण्यासाठी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर साहिलला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मुंबईत नोकरी, नव्या आयुष्याची सुरुवात आणि कुटुंबाच्या सुखासाठी पाहिलेली स्वप्ने या सगळ्यांची दामिनीच्या आयुष्यात आता केवळ आठवण उरली आहे. घरच्यांसाठी खाऊ आणण्याच्या साध्याशा विचाराने घराकडे निघालेल्या तरुणीला मृत्यूने गाठल्याची ही घटना मन सुन्न करणारी आहे. एकतर्फी प्रेमातून एखाद्याच्या आयुष्यावर हक्क गाजवण्याची मानसिकता किती भयावह ठरू शकते, याची जाणीव करून देणाऱ्या या हत्याकांडामुळे महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आईला शेवटचा फोन… ‘खायला काही आणू का?’ म्हणणाऱ्या दामिनीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या!
Leave a Comment




