रायगड : पेण-खोपोली मार्गावरील वरसई फाटा, चंपाली गार्डनसमोर भरधाव ट्रेलरने ॲक्टिव्हा स्कुटीला समोरून दिलेल्या भीषण धडकेत एका ५९ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
यासंदर्भातील माहितीनुसार, सुरेश शांताराम भेसरे (वय ५९, रा. आष्टे, पो. वरसई, ता. पेण) हे खरवली येथे गणपती दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या ॲक्टिव्हा स्कुटीवरून (क्रमांक MH-06-CG-0133) आष्टे येथील घराकडे परत निघाले होते. वरसई फाट्यावरील चंपाली गार्डनजवळ पोहोचले असता, पेणकडून खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरने (क्रमांक MH-43-CQ-0867) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ट्रेलरचालकाने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन अत्यंत बेदरकारपणे व भरधाव वेगाने चालविल्याने हा भीषण अपघात घडला.या धडकेमुळे सुरेश भेसरे हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात ट्रेलरचालक प्रेमलाल कुअरमन यादव (वय ५०, रा. वडखळ, ता. पेण, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्याविरोधात निष्काळजीपणा व बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.
पेण-खोपोली मार्गवार ट्रेलरच्या धडकेत स्कुटीस्वार ठार; चालक अटकेत
Leave a Comment





