लांजा : स्थानिक पातळीवरील विकासाचा ध्यास आणि आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत लांजा तालुक्यातील मौजे हर्चे येथील अनेक प्रमुख ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे हर्चे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून राजकीय वर्तुळात या घडामोडींची चर्चा रंगली आहे. पक्षाचा धनुष्यबाण हाती घेत ग्रामस्थांनी शिवसेनेच्या विचारधारेसोबत आणि आमदार सामंत यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार किरण सामंत यांनी नवप्रविष्ठांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले की, हर्चे गावातील सर्व प्रलंबित प्रश्न आणि पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. गावाचा कायापालट करण्यासाठी आणि शासनाच्या जनकल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी संघटित होऊन काम करावे आणि हर्चे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार सामंत यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळे आणि विकासकामांच्या धडाक्यामुळे प्रेरित होऊन हा प्रवेश केल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. या कार्यक्रमात समीर तेंडुलकर, प्रकाश भालवलकर, प्रभूजन तेंडुलकर, हर्षद तरल, अवधूत सकपाळ, मंदार गुरव, चंद्रशेखर शेलार, संदेश कुवार, अजय मयेकर, प्रवीण तरल, रामचंद्र माळी, संदीप कुवार, रवींद्र तांबे, शैलेश तांबे, प्रसाद पवार, अमृत कुवार, अनिकेत खानविलकर आणि दत्ताराम मयेकर यांच्यासह हर्चे गावातील इतर अनेक ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला.




