सावर्डे (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील गणित विषयाची गोडी वाढविण्यासोबतच त्यांची गणितीय पायाभूत कौशल्ये अधिक भक्कम व्हावीत, या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे गणित विषय समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गणित पाढे पाठांतर स्पर्धे’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार, २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीतील तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती दूर करून त्यांच्यात गणिताविषयी आवड, आत्मविश्वास आणि अचूक गणनकौशल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी वर्गनिहाय घेण्यात आली. प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरी दोन गटांत घेण्यात आली. पहिल्या गटात २ ते ३० पर्यंतचे पाढे पाठ असलेल्या विद्यार्थ्यांनी, तर दुसऱ्या गटात २ ते २० पर्यंतचे पाढे पाठ असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वेग, अचूकता आणि आत्मविश्वासाने पाढे सादर करत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत रंगत आणली.
२ ते ३० पाढे गटात इयत्ता पाचवी ब मधील भावेश देवेंद्र चव्हाण याने प्रथम क्रमांक मिळवला. याच वर्गातील गौरी विनेश वासकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर मिनसा अबू बकर तांबे आणि इयत्ता सहावी ब मधील समर्थ योगेश सोनवणे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. २ ते २० पाढे गटात दुर्वा सचिन चव्हाण हिने प्रथम क्रमांक, इयत्ता पाचवी ब मधील प्रिन्स नागेश ओळींबे याने द्वितीय क्रमांक, तर शौर्य राकेश घाग आणि दैवत रवींद्र घाणेकर यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला.
या उपक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांची विशेष प्रेरणा लाभली. त्यांनी स्पर्धेला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्याध्यापक विजय चव्हाण तसेच पर्यवेक्षक व गणित शिक्षक महेश कुलकर्णी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रेरणा कदम, ज्योती निकम आणि स्फूर्ती जाधव यांनी केले. स्पर्धेचे नियोजन गणित शिक्षक साजित चिकटे, अनंत डीके आणि गणेश बागवे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सकाळच्या सत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गणित विषय समूहातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेत्या विद्यार्थ्यांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद आणि पालकांनी अभिनंदन केले. पाढे पाठांतरासारख्या मूलभूत गणितीय कौशल्याला स्पर्धेची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाविषयी आत्मविश्वास आणि आवड निर्माण करणारा हा उपक्रम विद्यालयात कौतुकाचा विषय ठरला.
सावर्डे विद्यालयात गणित पाढे पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग
Leave a Comment






