रत्नागिरी : जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गुहागरचे आमदार तथा विरोधी पक्षाचे एकमेव लोकप्रतिनिधी भास्करराव जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह सत्ताधारी पक्षाला विविध प्रश्नांवर अक्षरशः धारेवर धरले. निधी वाटपातील उघड दुजाभाव, गुहागर मतदारसंघावरील राजकीय अन्याय आणि बैठका घेण्यातील प्रशासकीय दिरंगाई यावरून त्यांनी पालकमंत्री व अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. गुहागर मतदारसंघात कोणतीही घटनात्मक किंवा लोकप्रतिनिधी पदाची जबाबदारी नसलेल्या, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अथवा सरपंचही नसलेल्या बाहेरील व्यक्तींच्या शिफारस पत्रांवर विद्यमान आमदारांपेक्षा चारपट अधिक निधी दिला जात असल्याचा पर्दाफाश त्यांनी केला. इतकेच नव्हे तर अशा व्यक्तींनी दुसऱ्या मतदारसंघातील सुचवलेली कामेही नियोजन समितीकडून तात्काळ मंजूर केली जात असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
एका विशिष्ट माजी आमदाराच्या पत्रावर शासकीय तिजोरीतून झुकते माप देऊन निधी वाटप केला जात असल्याचा मुद्दा लावून धरत, “एकाच माजी आमदारावर मेहेरबानी दाखवणार असाल तर जिल्ह्यातील सर्वच माजी आमदारांच्या पत्रांवर तत्काळ निधी मंजूर करा,” असा रोकठोक सवाल जाधव यांनी उपस्थित केला; यावर ना. सामंत यांची मोठी अडचण झाली असून यापुढे अशा चुका होणार नाहीत अशी सारवासारव पालकमंत्र्यांना करावी लागली. नियमानुसार वर्षातून किमान चार बैठका होणे बंधनकारक असताना, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या पहिल्या बैठकीनंतर तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ विलंबाने ही बैठक घेतल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली; मात्र या दिरंगाईबाबत पालकमंत्र्यांकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते. विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळेच गुहागरवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा दावा करत, त्यांनी रखडलेल्या योजनांची आकडेवारी समोर ठेवून सर्व विधानसभा क्षेत्रांना समान न्यायाने निधी देण्याची जोरदार मागणी केली.
या बैठकीत आमदार जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचा अधिकृत ठराव मांडला. तसेच अलीकडे जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीनुसार अचानक शासकीय कार्यक्रम उरकण्याची नवी प्रथा सुरू झाली असून, इतरत्र काहीही करा, मात्र गुहागर मतदारसंघात यापुढे परस्पर कार्यक्रम आखल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. दरम्यान, या बैठकीत केवळ विरोधकच नव्हे, तर सत्ताधारी नेत्यांमधील अंतर्गत कलहही चव्हाट्यावर आला. खासदार सुनील तटकरे यांची विकासकामे रोखल्याच्या मुद्द्यावरून तटकरे आणि मंत्री योगेश कदम यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली; तर खासदार नारायण राणे यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनीही नियोजन बैठकांच्या प्रत्यक्ष फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले. अखेर आकडेवारी, भक्कम पुरावे आणि प्रशासकीय नियमांचा आधार घेत भास्करराव जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे बॅकफूटवर ढकलल्याने ही बैठक जाधव यांच्याच आक्रमक भूमिकेने गाजली.






