मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात विरोधकांकडून टीका होत असताना आता ठाकरे बंधूंनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत विराट संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, त्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मोर्चाची दिशा आणि रूपरेषा स्पष्ट केली.
४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीजवळ जमतील येथून मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर पोहोचेल. तेथे व्यासपीठ उभारण्यात येणार असून, मोर्चाचे सभेत रूपांतर होईल, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या गेल्या काही वर्षांतील कारभाराविरोधात हा मोर्चा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेसह ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपण यापूर्वीही अनेकदा भूमिका मांडली असून, २०१७-१८ मध्ये या संदर्भात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका ४ ऑक्टोबरच्या मोर्चात मांडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मोर्चाला कोणत्याही एका पक्षाचे स्वरूप नसेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, या मोर्चात विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांना बोलावणार का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर विरोधकांना पत्र पाठवणार नाही. पण सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आम्ही फोन करून मोर्चात येण्याचं आवाहन करणार आहोत, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मोर्चामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. सहभागी नागरिकांच्या हातात केवळ तिरंगा असेल, अशी माहिती त्यांनी दिली. हा मुद्दा लोकशाही आणि संविधानाशी संबंधित असल्याचे सांगत सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, विरोधी पक्षांना निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे आहे, असा आरोप भाजपकडून केला जात असल्याबाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, मराठीत एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे, असे म्हणत भाजपच्या आरोपाला एका वाक्यात प्रत्युत्तर दिले. आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या संयुक्त नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या विराट मोर्चाची दिशा आणि रूपरेषा स्पष्ट
Leave a Comment






