जैतापूर/राजन लाड: कोकणातील समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपत, तब्बल २६ वर्षांची उज्ज्वल सामाजिक-सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या ‘जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा २७ वा गणेशोत्सव यंदाही अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात, उत्साहात आणि समाजभान जपत संपन्न झाला. पहिल्या दिवसापासूनच विविध समाजोपयोगी आणि सांस्कृतिक उपक्रमांनी रंगलेल्या या उत्सवाला राजापूर तालुक्यासह रत्नागिरी आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. या सर्व मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी उत्सवाची सांगता झाली. विसर्जनापूर्वी उत्सव मंडपामध्ये प्रसिद्ध वकील तथा राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण व सत्कार सोहळा पार पडला. त्यांच्या हस्ते मंडळाच्या लॉटरी योजनेतील मुख्य विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली, तसेच वर्षभर अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ‘पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्था, मिठगावणे’च्या पदाधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जैतापूर एसटी स्टँड येथून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. कर्णकर्कश डीजे, फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण यांसारख्या अनिष्ट प्रथांना पूर्णपणे फाटा देत मंडळाने पर्यावरणपूरक व पारंपरिकतेला प्राधान्य दिले. या मिरवणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाट येथून आलेल्या कलाकारांनी सादर केलेले ‘१० फुटी कोंबडा नृत्य’ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. याशिवाय शिवणे येथील सुश्राव्य बेंजो पथक आणि तुळसुंदे उगवती वाडी येथील महिला व मुलींनी सादर केलेल्या शिस्तबद्ध लेझीम नृत्याने मिरवणुकीची रंगत वाढवली. वेळेचे काटेकोर भान राखत ही प्रदूषणमुक्त मिरवणूक जैतापूर बंदर धक्क्यावर पोहोचली. रात्री ८ वाजता होडीद्वारे खोल खाडीत नेऊन बाप्पाच्या मूर्तीचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
या संपूर्ण सोहळ्यात चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या पथकाने विशेष जबाबदारी सांभाळली. लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुरेश कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शांततापूर्ण वातावरण आणि काटेकोर नियोजनाचे कौतुक केले. या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, सचिव राकेश दांडेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, खजिनदार सुनील करगुटकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, महिला, कलाकार व भक्तांचे आभार मानले. जात, पात आणि पंथ बाजूला ठेवून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या जैतापूरच्या राजा मंडळाने यंदाही आपल्या आदर्श आयोजनाने सर्वांची मने जिंकली आहेत.






