लांजा : शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत पहाटेच्या अंधारात संशयितरीत्या फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी गस्तीदरम्यान ताब्यात घेतले आहे. अनंत राजाराम रेवाळे (वय ३५, रा. गवाणे, ता. लांजा) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्याचे पथक ३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास शहरात नियमित गस्त घालत होते. पहाटे ३.५० वाजण्याच्या सुमारास लांजा बाजारपेठेतील कोत्रे हॉटेल, मुंबई-गोवा महामार्गाशेजारील गॉडेसखल रोडजवळ एक इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी तत्काळ त्याला अडवून चौकशी केली असता, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपी अनंत रेवाळे असल्याचे निष्पन्न झाले. सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत चोरी करण्याच्या उद्देशानेच तो परिसरात दबा धरून भटकत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नितेश नवनाथ राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनंत रेवाळे याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.





