रत्नागिरी / वैभव पवार : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने नवकवींसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष कवितालेखन कार्यशाळा स्व. अनंतरावजी बैकर बहुद्देशीय संकुल सत्कोंडी येथे उत्साही वातावरणात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रमुख मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी सत्कोंडीकरांच्या देखण्या आणि आदर्श नियोजनाची प्रशंसा करत, आगामी वर्षाचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडी येथे आयोजित केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. सत्कोंडी गावातील भव्य परिसर, वाचनालयाची शिस्तबद्ध इमारत आणि दर्जेदार कार्यपद्धती पाहून प्रभावित झाल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील साहित्य चळवळीला बळ देण्याचा विश्वास व्यक्त केला.
सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश थुळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर यांनी बीजभाषणातून उपेक्षित घटकांसाठी साहित्याची दालने खुली करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सकाळच्या सत्रात ग्रंथदिंडी आणि राजू सुर्वे यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी सजलेल्या पुस्तक प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या एकदिवसीय कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील आद्यगझलकार देविदास पाटील, कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख अरुण मोर्ये, नवोदित गझलकार राजू सुर्वे आणि जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य प्रा. शिवराज गोपाळे यांनी कविता व गझलेचे तंत्र, लय, आशय, प्रतिमा आणि समीक्षेवर ४४ प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन करत थेट सराव करून घेतला. याप्रसंगी कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख परब, कोमसाप जिल्हा सचिव मुश्ताक खान, मालगुंड शाखाध्यक्षा नलिनीताई खेर उपस्थित होत्या. तसेच ‘कृष्णा माझं काय चुकलं’ या पुस्तकासाठी भाई भगत नाट्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कोंडीचे सुपुत्र अरुण मोर्ये यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, तर त्यांनीच या अभ्यासपूर्ण कार्यशाळेचे नेटके सूत्रसंचालन केले.





