पाचल (तुषार पाचलकर) : तालुक्यातील पाचल येथील राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळ, दिवाळवाडी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेली फॅन्सी ड्रेस स्पर्धा अत्यंत उत्साही व जल्लोषी वातावरणात संपन्न झाली. स्थानिक कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि सांस्कृतिक परंपरांचे संवर्धन व्हावे या हेतूने आयोजित या स्पर्धेला बालचमूसह स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकर्षक वेशभूषा आणि कल्पक सादरीकरणाच्या जोरावर स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक तसेच मनोरंजनात्मक अशा विविधांगी व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे साकारल्या. यामध्ये भगवान विष्णूंचा वराह अवतार, बालाजी देव, अंबाबाई माता, सप्तशृंगी देवी आणि श्रीकृष्ण यांसारख्या पौराणिक रूपांमधून समृद्ध परंपरेचे दर्शन घडले. तर अंगावर रोमांच उभे करणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यासोबतच विनोदी व काल्पनिक छटा असलेली ‘बाटलीमधला गंगाराम’, मंजुलिका, भूत आणि ममी यांसारख्या वेधक पात्रांनी कार्यक्रमात मोठी रंगत भरली. स्पर्धकांच्या कसदार अभिनयाला आणि कल्पकतेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
भावी पिढीतील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करणे या उद्देशाने मंडळाकडून दरवर्षी अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे यंदाच्या नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला असून, मंडळाच्या या शिस्तबद्ध आणि कौतुकास्पद आयोजनाबद्दल दिवाळवाडी परिसरातील नागरिक व भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





