पर्यटन, ऐतिहासिक वारसा आणि सुरक्षित प्रवासासाठी सुयोग्य नियोजनाची नागरिकांमधून वाढती मागणी
जैतापूर (राजन लाड): कोकण किनारपट्टीच्या सर्वांगीण विकासाची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ४ म्हणजेच ‘रेवस-रेड्डी सागरी महामार्गा’वर राजापूर तालुक्यातील आडीवरे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून थेट सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या महत्त्वाच्या सागरी महामार्गावर भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता, आडीवरे येथे रस्ता रुंदीकरण करणे अथवा गावाला वळसा घालून जाणारा पर्यायी बाह्यवळण (बायपास) मार्ग तयार करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या संदर्भात प्रशासनाकडून तातडीने योग्य नियोजन झाल्यास लाखो भाविक, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा प्रवास अधिक गतिमान व सुरक्षित होणार आहे.
हा सागरी महामार्ग केवळ प्रवासाचा मार्ग नसून कोकणातील अथांग समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक गडदुर्गांना जोडणारा एक संपन्न पर्यटन कॉरिडॉर ठरत आहे. या मार्गाच्या सानिध्यात रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध भाटे बीच, गावखडीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा, राजापूर तालुक्यातील विस्तीर्ण कशेळी व मनमोहक आंबोळगड बीच अशी प्रसिद्ध पर्यटनस्थळे येतात. त्याचबरोबर महाराष्ट्रात दुर्मीळ असलेले कशेळीचे ‘श्री कणकादित्य सूर्यमंदिर’, स्वामी स्वरूपानंदांची पावनभूमी ‘पावस’ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आडीवरे येथील ‘श्री महाकाली देवस्थान’ ही प्रमुख तीर्थक्षेत्रे याच मार्गावर जोडलेली आहेत. याशिवाय समुद्राच्या मुखाशी उभा असलेला किल्ले पूर्णगड, किल्ले आंबोळगड आणि किल्ले यशवंतगड हे ऐतिहासिक वारसास्थळेही याच पट्ट्यात येत असल्याने येथे पर्यटकांचा मोठा राबता असतो.
धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचा हा संपन्न संगम असल्यामुळे या सागरी महामार्गावर वर्षभर, विशेषतः सुट्ट्यांच्या हंगामात आणि नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक व पर्यटकांची अलोट गर्दी उसळते. आडीवरे येथील श्री महाकाली मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत तर वाहनांची संख्या प्रचंड वाढून संपूर्ण परिसर गजबजून जातो. मात्र सध्या आडीवरे परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद असल्याने येथे वारंवार मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या कोंडीचा थेट फटका लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह स्थानिक जनजीवनाला आणि रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही बसत आहे.
ही बिकट समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आडीवरे येथील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करणे अथवा बाह्यवळण मार्गाची स्वतंत्र आखणी करणे ही काळाची गरज ठरली आहे. पर्यायी बायपास मार्ग उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्ग व गोव्याकडे जाणारी वेगवान आणि अवजड वाहने थेट पुढे निघून जातील, ज्यामुळे आडीवरे बाजारपेठ आणि मंदिर परिसरावरील वाहतुकीचा प्रचंड ताण हलका होईल. यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पायी जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित वावर मिळेल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि सागरी महामार्गाच्या मूळ उद्देशाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने या संवेदनशील भागाची पाहणी करून तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी ठाम मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.







