खेड : शैक्षणिक वर्ष २०२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ‘आपुलकीचा मुक्काम’ या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्राचे राज्यमंत्री (गृह-शहरी, महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज) नामदार श्री. योगेश रामदास कदम यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ना. कदम यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या शिष्यवृत्ती परीक्षेत आंबवली शाळेच्या चिमुकल्यांनी गुणवत्ता यादीत आपले नाव कोरत चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. यामध्ये इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत थेट सहावा क्रमांक पटकावून सुवर्णयशाचा मान मिळवला. याच इयत्तेत कुमारी पूर्वा सतीश यादव हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ३२ वे स्थान, तर कुमार रुद्र शरद कदम याने जिल्हा गुणवत्ता यादीत १४१ वा क्रमांक संपादन केला. तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी गौरी विनायक यादव हिने जिल्हा गुणवत्ता यादीत १६२ वे स्थान प्राप्त करून शाळेची मान उंचावली आहे.
या भव्य सत्कार सोहळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सदगुरू उर्फ नाना महादेव कदम, खेड पंचायत समितीचे उपसभापती सुनील मोरे, सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, तिसंगी गणाचे पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, आंबवली गावचे उपसरपंच विजय यादव, वरवली केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष सपकाळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्ष सिद्धी यादव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोगावले, प्रतिष्ठित नागरिक मारुती पांडुरंग यादव, राजेश यादव, विश्वास कदम यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर आणि उपशिक्षिका रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) यांच्या अथक परिश्रमातून व योग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश खेचून आणले असून, ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेने मारलेल्या या भरारीचे सर्व स्तरांतून प्रचंड कौतुक होत आहे.




