संगमेश्वर (वार्ताहर): चंदीगडच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘नॅशनल डॉक्टर्स क्रिकेट लीग’ स्पर्धेत पार्टनर्स युनायटेड मुंबई संघाने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दिमाखात विजेतेपद पटकावले. मुंबई संघाच्या या झळाळत्या विजयात संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील सुप्रसिद्ध दंतवैद्य डॉ. अभिराज नारकर यांनी बजावलेली अष्टपैलू कामगिरी अत्यंत निर्णायक ठरली. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीत डॉ. नारकर यांनी अचूक टप्प्यावर भेदक गोलंदाजी करत तब्बल पाच फलंदाजांना तंबूत धाडले आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत संघाच्या अजिंक्यपदावर विजयाचा शिक्का मोर्तब केले.
संपूर्ण स्पर्धेतच डॉ. नारकर यांच्या गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला. त्यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी माऱ्याच्या जोरावर त्यांनी स्पर्धेतील दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये ‘बेस्ट बॉलर’चा किताब आपल्या नावे केला, तर एका सामन्यात अष्टपैलू खेळाच्या जोरावर ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानाचा पुरस्कारही पटकावला. अंतिम सामन्यात त्यांनी घेतलेल्या पाच बळींनी मुंबई संघाचा विजयाचा मार्ग अधिक सुकर केला. व्यवसायाने दंतचिकित्सक असलेले डॉ. नारकर हे वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दैनंदिन जबाबदाऱ्या चोख सांभाळत असतानाच क्रिकेटवरील आपली निष्ठा आणि आवड सातत्याने जपत आहेत. आपल्या दर्जेदार कामगिरीमुळे त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या घवघवीत यशानंतर वैद्यकीय वर्तुळासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार आणि मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.






