खेड : आपत्ती, संकट आणि अडचणीच्या काळात कोणताही भेदभाव न बाळगता समाजसेवेचा दीप तेवत ठेवत माणुसकीचा अखंड वसा जोपासणारे खेड येथील ज्येष्ठ समाजसेवक बशीर एम. हजवानी यांच्या कार्याचा महाड प्रेस असोसिएशनच्या (रजि.) १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘दीपस्तंभ पुरस्कार २०२६’ देऊन नुकताच महाड येथे गौरव करण्यात आला. रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या भव्य सोहळ्यात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील विविध समाजोपयोगी योगदानाची दखल घेऊन हजवानी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, यामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२०२१ मध्ये महाड शहर आणि परिसराला महापुराचा मोठा तडाखा बसून जनजीवन विस्कळीत झाले असता, कुटुंबांसमोर उभे राहिलेले संकट ओळखून हजवानी यांनी आपत्तीग्रस्तांच्या सेवेसाठी तातडीने प्रत्यक्ष मदतकार्य राबवून आपल्या सामाजिक जाणिवेचा आदर्श घडवला होता. यासोबतच कोकण रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे अडकून पडलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना अन्न, पाणी आणि आवश्यक सेवा पुरवत अनोळखी व्यक्तींनाही आपलेपणाने मदतीचा हात देण्याची त्यांची प्रेरणादायी वृत्ती विशेष लक्षवेधी ठरली आहे. अशा संकटात धावून जाणाऱ्या निष्काम समाजसेवेची महाड प्रेस असोसिएशनने पावती दिल्याने हजवानी यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच भावी वाटचालीस नवी ऊर्जा देणारा ठरला असून, या सन्मानाबद्दल खेडसह संपूर्ण रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि सदिच्छांचा वर्षाव होत आहे.






