सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते नवी मुंबई दरम्यान हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून, आता ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस अव्याहतपणे सुरू राहणार आहे. रविवारसह दररोज विमानांची उड्डाणे होणार असल्याने कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसह पर्यटकांचा प्रवास अधिक गतिमान आणि सोयीस्कर होणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी समाजमाध्यमावर अधिकृत पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली असून, या मार्गावरील दररोजचे नियमित उड्डाण वेळापत्रकही जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळावरून नियमित आणि अखंडित विमानसेवा सुरू राहावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले असून, आता आठवड्यातील सर्व दिवस विमानांची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना वेळेची मोठी बचत करता येणार आहे. मुंबई आणि कोकणातील दळणवळणाला यामुळे अधिक गती मिळणार असून, पर्यटनासह स्थानिक व्यापारी वर्गालाही या दररोजच्या थेट विमानसेवेचा मोठा लाभ होणार आहे.





