देवरुख : शासकीय कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसण्यासाठी केवळ प्रतिक्षा न करावी लागता त्यांना वाचनाची उत्तम संधी मिळावी, या उद्देशाने पंचायत समिती देवरुखच्या स्वागत कक्षात वर्तमानपत्रे आणि ग्रामविकासविषयक पुस्तके उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा समाजसेविका सौ. वैदेही सुधीर सावंत यांनी शासकीय कार्यालयांत अशा प्रकारची सुविधा असावी, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीची दखल घेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते. या निर्देशांची जिल्ह्यात सर्वात आधी प्रत्यक्ष अंमलबजावणी करत देवरुख पंचायत समितीने पुढाकार घेतला असून, सध्या स्वागत कक्षात सकाळ, तरुण भारत, सागर आणि रत्नागिरी टाइम्स ही प्रमुख वर्तमानपत्रे नागरिकांसाठी नियमित उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सर्वप्रथम हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांच्या सोयीला प्राधान्य दिल्याबद्दल चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे सौ. वैदेही सावंत यांनी पंचायत समितीच्या सभापती माननीय शर्वरी वेल्ये यांना अभिनंदनपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या संपूर्ण टीमचा विशेष गौरव केला. याप्रसंगी बोलताना सभापती शर्वरी वेल्ये यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच पंचायत समितीच्या आवारात लवकरच नागरिकांच्या वाचनसंस्कृतीला अधिक बळ देण्यासाठी छोटेसे ग्रंथालय सुरू करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास उपसभापती प्रफुल्लचंद्र बाईत, जिल्हा परिषद सदस्य माधव गीते, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, महेश जड्यार, क्षमा जाधव, दिपाली जाधव, सुरेश माईन, प्रिया सुवारे उपस्थित होते. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी सुनिल लोंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






