चिपळूण : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडलाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील बारा गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी व शिलाई मशीनसह आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वामी बिल्डिंग, परशुराम नगर येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात देण्यात आला.
महिलांना केवळ आर्थिक मदत करण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. घरघंटी व शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला घरबसल्या व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, नगरसेविका अंजली कदम, शहर सरचिटणीस सारिका भावे, उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, रुई खेडेकर, स्वाती देवळेकर, माजी नगरसेविका संजीवनी शिगवण, युवा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, इम्तियाज कडू, संगीता पालकर, अमेय सुर्वे, संदीप बोंडकर, मृणाल घटे, शक्तीकुमार चव्हाण, विनायक भैरवकर, गणेश आग्रे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू यांनी, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा प्रत्येक उपक्रम समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी चिपळूण शहर मंडल सातत्याने प्रयत्नशील आहे, असे सांगितले. पक्षाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे काम सुरू असून, भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरसेविका अंजली कदम यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत, भारतीय जनता पार्टी महिलांना सक्षम करण्यासाठी सदोदित कार्यरत राहील, असे मत व्यक्त केले. महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याला बळ देणे होय. घरघंटी व शिलाई मशीनच्या माध्यमातून संबंधित महिलांना उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला असून, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. घरच्या घरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधन मिळाल्याने महिलांनी भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडलाचे आभार मानले. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडूनही कौतुक करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘सेवा, सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरण’ या त्रिसूत्रीचा संदेश देण्यात आला. गरजू महिलांना मदतीऐवजी रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे त्यांच्या स्वावलंबनाला नवी दिशा मिळणार आहे.
गरजू महिलांना स्वयंरोजगाराचे बळ; भाजप चिपळूण शहर मंडलातर्फे घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप
Leave a Comment






