चिपळूण : चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या पिता-पुत्राला एका भरधाव दुचाकीने अत्यंत बेदरकारपणे चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात वडील आणि चिमुकला मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर दुचाकीस्वार आपली गाडी रस्त्यावरच सोडून सहकाऱ्यासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. ही दुर्घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका ते चिंचनाका मार्गावरील आनंदस् हॉटेलसमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवासी अमोल सहदेव वडार आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा दुर्वांश अमोल वडार हे दोघे रात्रीच्या वेळी महामार्गावरून रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी श्री अपार्टमेंट, चिपळूण येथे राहणारा आरोपी दुचाकीचालक प्रमोद महादेव जाधव (वय ३१) हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक MH ०८ BL ११६०) घेऊन भरधाव वेगाने आला. रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून त्याने रस्ता ओलांडणाऱ्या अमोल वडार व त्यांचा मुलगा दुर्वांश यांना थेट जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापती झाल्या. अपघात घडताच आसपासच्या नागरिकांची गर्दी जमू लागल्याचे पाहून आरोपी चालक प्रमोद जाधव आणि त्याच्या मागे बसलेला मित्र अभिजित कुळे या दोघांनी स्वतःची दुचाकी रस्त्यावरच टाकून तेथून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन गंभीर जखमी पिता-पुत्राला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जखमींचे नातेवाईक अक्षय नारायण कलकुटकी (वय ३५, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, रा. गांधीनगर, वडारकॉलनी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी फरार आरोपी चालक प्रमोद महादेव जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४(अ) अन्वये गुन्हा रजि. नं. २९९/२०२६ दाखल केला असून, चिपळूण पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.






