आमदार भास्कर जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या मदतीची मागणी
गुहागर : यंदाच्या पावसाळ्यात कोकणात झालेल्या अनियमित आणि अत्यंत कमी पावसामुळे भात व नाचणी या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, आगामी उन्हाळ्यात संपूर्ण किनारपट्टीवर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना नेते भास्करराव जाधव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून कोकणासाठी विशेष उपाययोजना आखण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई देण्याची आग्रही मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील शेतीची विदारक अवस्था मांडताना नमूद केले आहे की, यंदाचा खरीप हंगाम बळीराजासाठी अत्यंत संकटाचा ठरला आहे. मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे सुरुवातीलाच भात पिकांची लागवड विलंबाने झाली. शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींवर मात करत बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि नांगरणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला; परंतु लागवडीनंतरही पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. सध्या पिके गर्भात असतानाच पावसाअभावी सुकू लागल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक भांडवल पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
शेतीच्या नुकसानीसोबतच आगामी काळातील पाणीटंचाईच्या दाहकतेवरही आमदार जाधव यांनी बोट ठेवले आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी कमी असल्याने भूगर्भातील पाणीपातळी वेगाने खालावली आहे. याचा फटका केवळ शेतीलाच नव्हे, तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईच्या रूपाने कोकणातील नागरिकांना बसणार आहे. या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने जलसंधारण, पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच काटेकोर संवर्धन व नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. डोंगर उतारावरून समुद्राला वाहून जाणारे पाणी तात्काळ अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाने ठोस आराखडा तयार करावा, जेणेकरून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असेही जाधव यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.






