रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरी तसेच ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसली पाहिजे, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रशासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावले आहेत. सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर तारीखनिहाय अहवाल आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शवणारी छायाचित्रे तातडीने सादर करण्याचे थेट निर्देश त्यांनी दिले असून, या मोहिमेत पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वतंत्र ‘सेंट्रलाइज पोर्टल’ विकसित करावे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी मांडली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घनकचरा व्यवस्थापन नियम अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष कक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी संदीप टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला. कचरा व्यवस्थापनाच्या कामात अचूकता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी ‘सेंट्रलाइज पोर्टल’ची संकल्पना मांडली. या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांनी केलेल्या दैनंदिन कामगिरीची थेट नोंद ठेवली जाणार असून, प्रशासनाला कामाचा अचूक आढावा एका क्लिकवर घेणे शक्य होणार आहे.
शहरांमधील नगरपालिका, नगरपंचायतींपासून ते अगदी दुर्गम ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींपर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर आता कठोर पावले उचलली जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सभागृहात मांडली.






