माणगाव : ऑक्टोबर हिटच्या असह्य उकाड्यानंतर रायगड जिल्ह्यात वातावरणात लक्षणीय बदल झाला असून, गुलाबी थंडीच्या आगमनासोबतच संपूर्ण निसर्ग धुक्याच्या पांढऱ्याशुभ्र चादरीत लपेटला गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानाचा पारा २२ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरत असल्याने गारवा चांगलाच वाढला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर विशेषतः ताम्हिणी घाट, वरंध घाट आणि मोर्बे घाट परिसरात शुभ्र आणि करड्या रंगांचे ढग थेट जमिनीवर उतरल्याचा भास होत असून, आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवळ आणि दाट धुके यामुळे येथे प्रत्यक्ष स्वर्गाचीच अनुभूती येत आहे. या मनमोहक आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून पर्यटक, दुर्गप्रेमी आणि प्रवाशांनी घाटमाथ्यावर मोठी गर्दी केली आहे.
ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी हे पोषक वातावरण ठरत असल्याने रायगड, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड आणि कर्नाळा यांसारख्या जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ल्यांवर दुर्गभ्रमंतीसाठी ट्रेकर्सची पावले वळत आहेत. किल्ले आणि डोंगरमाथ्यांवर पसरलेल्या ढगांची अनुभूती घेत पर्यटक या निसर्गवैभवाचा मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच अंतर्गत राज्य मार्गांवर पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे वाहनचालकांना दृश्यमानतेचा अडथळा निर्माण होत असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने निसर्गसौंदर्यात भर पडली असून, लवकरच जिल्ह्यात विविध प्रजातींच्या स्थलांतरित पक्ष्यांचेही आगमन सुरू होईल, असे निसर्ग व पक्षी अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी सांगितले आहे. एकूणच, धुक्याची दुलई आणि ढगांचा हा अद्भुत खेळ अनुभवण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटन अक्षरशः बहरले आहे.






