रत्नागिरी : धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कोकणातील गणेशोत्सव यंदा स्थानिक बाजारपेठांसाठी आर्थिक संजीवनी देणारा ठरला आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुण्यासह इतर शहरांत स्थायिक झालेल्या लाखो चाकरमान्यांच्या उपस्थितीत यंदा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गौरी-गणपती सण साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल नोंदवली गेली असून मूर्तिकार, सजावटकार, मिठाई विक्रेते आणि विद्युत रोषणाईसह विविध लहान-मोठ्या व्यावसायिकांवरील मंदीचे विघ्न पार दूर झाले आहे.
पूर्वी गावाकडे येताना मुंबई-पुण्याहून खरेदी करून आणणारे चाकरमानी आता प्रवासातील गर्दी टाळण्यासाठी स्थानिक बाजारपेठांनाच पसंती देत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने अक्षरशः झळाळून निघाल्या. गणेश चतुर्थीला जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ घरगुती तसेच ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या काळात दीड दिवसांपासून ते अकरा दिवसांपर्यंत चालणाऱ्या उत्सवात भाविकांनी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सढळ हस्ते खर्च केला. प्रत्येक कुटुंबाचा गणेशमूर्ती, मखर सजावट, विद्युत रोषणाई, पूजा साहित्य, कपडे, वाण साहित्य, फळे-फुले, भाज्या आणि प्रसादाच्या मिठाईवर होणारा सरासरी खर्च किमान सात हजार रुपये गृहीत धरला, तरी केवळ या मूलभूत वस्तूंमधूनच सुमारे १११ कोटी रुपयांची उलाढाल सहज पार पडते. याशिवाय बस, रेल्वे व रिक्षा वाहतुकीवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च स्वतंत्र राहिला आहे.
बाजारपेठेतील एकूण खरेदीच्या पॅटर्नचा विचार केल्यास ग्राहकांनी सर्वाधिक ३५ टक्के खर्च मूर्ती व आरास साहित्यावर केला आहे. त्याखालोखाल २५ टक्के खर्च पूजा साहित्यावर, १५ टक्के कपड्यांवर, १५ टक्के प्रसादावर तर उर्वरित १० टक्के खर्च फुले व फटाक्यांवर झाला आहे. अलीकडच्या काळात सण-उत्सवांमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी एक रंग आणि एकाच डिझाईनच्या कपड्यांची वेशभूषा करण्याचे प्रमाण वाढल्याने विसर्जन मिरवणुकांसाठी कपड्यांवरही मोठा खर्च करण्यात आला. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये भव्य मंडप उभारणी, नेत्रदीपक रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन यामुळे बाजारातील पैशांचा ओघ सातत्याने सुरू राहिला. पावसाचे कोणतेही विघ्न नसताना उत्साहात पार पडलेल्या या उत्सवाने कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले आहे.





