लांजा/अरबाज नेवरेकर : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर लांजा शहरासह तालुक्यात लाडक्या गणरायाचे आज वाजतगाजत आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची सजावट, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या बाप्पाचे उत्साहात स्वागत केले.
गणरायाच्या आगमनासाठी मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात तयारी सुरू होती. घराघरांत आकर्षक सजावट करण्यात आली असून, गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडप व पूजास्थळे सजविण्यात आली आहेत. सकाळपासूनच गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांची लगबग शहरातील प्रमुख मार्गांवर पाहायला मिळाली.
ढोल-ताशे, लेझीम तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. महिला, पुरुष, युवक तसेच बालगोपाळांनी उत्साहात सहभागी होत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.
लांजा तालुक्यात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, पुढील दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात
Leave a Comment






