गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील काजळी येथे सोमवारी (२१ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास गणपती स्पेशल एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. गुहागरहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या गणपती स्पेशल एसटी बसला मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात एसटी बसच्या मागील भागाचे तसेच ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, बसमधील २ ते ३ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
गणपती उत्सवानिमित्त गुहागरहून नालासोपाऱ्याकडे जाणारी एसटी बस सुमारे ५० ते ६० प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. काजळी परिसरात बस आली असताना मागून आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की बसच्या मागील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे गुहागर-चिपळूण मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू आहे. अपघातग्रस्त ट्रक हटविण्याचे काम सुरू असून, वाहने हटविल्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त ट्रक गुहागर तालुक्यातील वरवेली येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असताना हा अपघात घडला. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे ५० ते ६० प्रवासी असलेल्या गणपती स्पेशल बसला अपघात झाल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार मोठी जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
गुहागर: काजळी येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात
Leave a Comment





