नाटे : राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील कासार गल्ली परिसरात टपरीत सुरू असलेल्या बेकायदेशीर कल्याण मटका जुगारावर सागरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत ६६ वर्षीय विश्वनाथ नारायण मिराशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता कासार गल्लीतील एका टपरीत ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी विश्वनाथ नारायण मिराशी (वय ६६, रा. नाटे भराडीनवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा बेकायदेशीर व बिगरपरवाना कल्याण मटका खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तसेच तो इतर लोकांकडून जुगार खेळवून घेत असल्याचेही आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करून जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिवाजी पाटील (वय ३२, ब.नं. ४१०) यांनी फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ मिराशी याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १०२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.





