तिरुवनंतपुरम-मदार जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा
रत्नागिरी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची व पर्यटकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने १२ विशेष फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवातील विक्रमी गर्दीनंतर आता दिवाळीतही कोकण रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक भार उचलत असल्याने, मुंबईहून गोव्यासह दक्षिणेकडे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना या विशेष गाड्यांमुळे एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. या नियोजनानुसार ट्रेन क्रमांक ०६०१३ / ०६०१४ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन दरम्यान ही साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे.
वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेन २१ व २८ ऑक्टोबर तसेच ४, ११, १८ आणि २५ नोव्हेंबर २०२६ या बुधवारी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सकाळी ०७.४५ वाजता रवाना होईल व तिसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता मदार जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०६०१४ मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक स्पेशल २४ व ३१ ऑक्टोबर तसेच ७, १४, २१ आणि २८ नोव्हेंबर २०२६ या शनिवारी मदार जंक्शन येथून रात्री २१.४० वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी मध्यरात्री ००.४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रलला पोहोचेल.
या विशेष गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिवी, मडगाव जंक्शन, कारवार, कुमठा, मुर्डेश्वर, मोकंबिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी रोड, सुरथकल रोड आणि मंगळुरू जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय कोल्लम जंक्शन, कायनकुलम, मावेलीकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चांगनासेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिसूर, शोरानूर जंक्शन, तिरूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड तसेच पनवेल, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा जंक्शन, गोध्रा जंक्शन, मंदसौर, नीमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजयनगर आणि अजमेर जंक्शन या स्थानकांवरही ही गाडी थांबणार आहे.
एकूण २० एलएचबी (LHB) डब्यांची रचना असलेल्या या वातानुकूलित विशेष गाडीत २-टियर एसीचा १ डबा, ३-टियर एसीचे ४ डबे, ३-टियर एसी इकॉनॉमीचे १३ डबे आणि २ जनरेटर कारचा समावेश असेल. गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांच्या अधिकृत माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कोकण रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी गुगल प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवरील ‘केआर मिरर’ (KR Mirror) ॲप डाउनलोड करून या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





