लांजा : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका ७८ वर्षीय महिलेच्या आधारकार्डचा गैरवापर करून बँक खाते उघडणे, तसेच अटक आणि बदनामीची धमकी देत तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लांजा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुशांत पिसे असे नाव सांगणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील शेवरवाडी, सीनियर कॉलेजजवळ राहणाऱ्या ७८ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे तसेच पोलीस सायबर विभागाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने महिलेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. या संभाषणादरम्यान महिलेच्या आधारकार्डचा वापर करून मुंबई येथे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आल्याचे समोर आले.
या बँक खात्यामध्ये अब्दुल रेहमान नावाच्या व्यक्तीने विविध संघटनांकडून पैसे गोळा करून ते महिलेच्या नावावरील कॅनरा बँक खात्यात जमा केल्याचे संशयिताने सांगितले. या व्यवहारांमधून महिलेच्या खात्यावर जमा होणाऱ्या रकमेच्या १० टक्के कमिशन देण्यात येत असल्याचेही त्याने भासवले. मात्र, या प्रकरणात अटक होऊ शकते तसेच समाजात बदनामी केली जाईल, अशी भीती दाखवून महिलेवर दबाव निर्माण करण्यात आला.
त्यानंतर संशयिताने महिलेला एसबीआय बँकेतील खात्यामधून आरटीजीएसद्वारे Punit Traders या नावाने असलेल्या बँक ऑफ इंडिया खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. अटकेची भीती आणि बदनामीच्या धमकीमुळे महिलेची दिशाभूल करून तिच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ६० लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), २०४, २०५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी), ६६(डी) नुसार ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयिताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.





