खेड : खेड तालुक्यातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, दोघांचेही अपहरण झाल्याच्या संशयावरून खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत बहीरवली फाटा, सुसेरी नं. १ बौद्धवाडी येथील साहिल बाबूराव शिर्के (वय २२) हा तरुण १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेला. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र कसून शोध घेऊनही तो मिळून आला नाही. साहिल याला अज्ञात व्यक्तीने गैरमार्गाने डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्याची पत्नी दिक्षा सिद्धार्थ जाधव (वय २२, रा. शिर्शी, ता. खेड) हिने खेड पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे.
दुसऱ्या घटनेत, मूळचा गोरेवाडी (वेरळ) येथील रहिवासी असलेला व सध्या लोटे घाणेखूंट येथे राहणारा सतीश बाळाजी गोरे (वय २३) हा तरुण १० ऑगस्ट रोजी सकाळी खोपी येथून लोटे येथे जाण्यासाठी आपल्या ताब्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलवरून (क्र. MH ०८ BB ०५९२) निघाला होता. मात्र, त्याच रात्रीपासून त्याचा मोबाईल फोन बंद येत असून कामाच्या ठिकाणी व राहत्या घरी चौकशी केली असता तो तेथेही पोहोचला नसल्याचे उघडकीस आले. अनेक दिवस शोध घेऊनही सतीशचा कोणताही सुगावा न लागल्याने अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केल्याची तक्रार त्याचे वडील बाबू बाळाजी गोरे (वय ४०, रा. खोपी फाटा) यांनी दिली. या दोन्ही प्रकरणांत खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४०(३) अन्वये अपहरणाचे गुन्हे नोंदवून तपास चक्र वेगवान केली आहेत.






