लांजा (अरबाज नेवरेकर): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी घाट आणि अंजणारी पूल परिसर प्रवाशांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत असून, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात असल्याचा संतप्त आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी केला आहे. अंजणारी ते वाकेड दरम्यान अवघ्या दोन महिन्यांत तब्बल १२ भीषण अपघात घडले असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच महामार्गाचे तातडीने रोड सेफ्टी ऑडिट करून जीवितहानीची जबाबदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि कंत्राटदारावर निश्चित करावी, अशी आक्रमक मागणी कदम यांनी केली आहे.
नुकत्याच अंजणारी पुलाजवळ घडलेल्या भीषण दुर्घटनेत मदतकार्यासाठी निघालेले महामार्ग वाहतूक मदत केंद्र हातखंबा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड यांच्यासह ट्रकचालक व क्लिनर अशा तिघांचा दुर्दैवी अंत झाला, तर पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे गंभीर जखमी झाले. या अत्यंत वेदनादायी घटनेचा संदर्भ देत कदम यांनी, अपघातांचे खापर केवळ वाहनचालकांच्या निष्काळजीपणावर फोडून महामार्ग प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही, असे स्पष्ट केले. अंजणारी घाटातील अतिशय तीव्र उतार, धोकादायक वळणे, रस्त्याची सदोष भौमितिक रचना, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर आणि संरक्षक कठड्यांचा अभाव या सर्व तांत्रिक त्रुटी अपघातांना आमंत्रण देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, १३ ऑगस्ट रोजीच महामार्ग विभागाला लेखी निवेदन देऊन अंजणारी परिसरातील या संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधले होते आणि तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्या निवेदनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळेच ही अपघातांची मालिका सुरू राहिली आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यासह निष्पापांना प्राण गमवावे लागले, असा थेट आरोप त्यांनी केला. गेल्या चौदा-पंधरा वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या आणि उद्घाटनाच्या घाईगडबडीत दर्जा व रस्ता सुरक्षेचे सर्व निकष धाब्यावर बसवले जात असून, लांजा उपशेट्येवाडी येथील उड्डाणपुलाच्या भिंतीतून होणारी पाण्याची गळती ही महामार्गाच्या निकृष्ट कामाची जिवंत साक्ष असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अंजणारी ते वाकेड दरम्यान झालेल्या अपघातांमधील जीवितहानी, जखमींची संख्या आणि वित्तहानीची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने तात्काळ जाहीर करावी आणि दिलेल्या निवेदनावर काय कारवाई केली याचा लेखी खुलासा करावा, अशी मागणी करत महामार्गावरील सर्व उड्डाणपुलांचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज कदम यांनी व्यक्त केली. अपघात घडल्यानंतर केवळ गुन्हे दाखल करून किंवा पंचनामे करून शांत न बसता कायमस्वरूपी सुरक्षित उपाययोजना होईपर्यंत त्या भागात तात्पुरती वेगमर्यादा लागू करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत, कोकणवासीयांना केवळ महामार्ग नव्हे तर सुरक्षित प्रवासाचा हक्क हवा आहे, असा इशारा दत्ताजी कदम यांनी दिला आहे.





